
मुंबई प्रतिनिधी
दुबईमध्ये वास्तव्यास राहून भारतात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणातील पाहिजे आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला अखेर भारतात आणून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे
गुन्हे शाखा कक्ष-७, घाटकोपर, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थ रॅकेटमध्ये दुबईहून थेट नियंत्रण ठेवले जात होते. आरोपी सलीम शेख हा आपल्या स्थानिक हस्तकांमार्फत भारतात अंमली पदार्थ तयार करून विक्री करत होता. एकूण १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, आतापर्यंत १२६.१४१ किलोग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, रोकड ४.१९ कोटी रुपये, सोन्याचे दागिने, मोटारी, मोटारसायकल आणि अंमली पदार्थ निर्मिती साहित्य असा एकूण २५६.४९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाची सुरुवात दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कुर्ला (प.) परिसरातून झाली. सयाजी पगारे चाळजवळील फुटपाथवर छापा टाकून परवीन बानो गुलाम शेख हिच्याकडून ६४१ ग्रॅम मेफेड्रॉन, १२.२० लाख रुपयांची रोकड आणि १.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून तिला अटक करण्यात आली.
चौकशीत तिचा संपर्क दुबईत वास्तव्यास असलेल्या सलीम शेखशी असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याचा हस्तक साजीद मोहम्मद आसिफ शेख उर्फ ‘डॅब्ज’ यास अटक करून मिरा रोड येथून ३ किलोग्रॅम मेफेड्रॉन आणि ३.६८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.याप्रकरणी तपास अधिक वाढवून सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ पोलिस ठाणे हद्दीत इरळी गावातील कारखान्यावर पोलिसांनी २५ मार्च २०२४ रोजी धाड टाकली. त्यात मेफेड्रॉन तयार करण्याचा गुप्त कारखाना सापडून १२२.५० किलोग्रॅम अंमली पदार्थ, उत्पादनासाठी लागणारे साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली.
या कारवाईत सहा आरोपींना अटक केली गेली. सुरत येथील रॉ मटेरियल पुरवणाऱ्या आणि तयार माल विकणाऱ्या दोन आरोपींनाही नंतर अटक करण्यात आली.दुबईतील आरोपी ताहेर सलीम डोला आणि मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना यापूर्वीच भारतात आणून अटक झाली आहे. फरार सलीम शेख याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली गेली होती. त्यावरून यूएई पोलिसांनी त्याला अटक केली आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर भारतीय अधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले.
२२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात येताच न्यायालयीन प्रकियेने कोठडी सुनावण्यात आली.या संपूर्ण ऑपरेशनचे मार्गदर्शन महाराष्ट्र पोलीस आयुक्त देवेन् भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांनी केले.
ही कारवाई कक्ष-७, गुन्हे शाखा, गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उप निरीक्षक स्वप्निल काळे, पोलीस उप निरीक्षक महेश शेलार, पोलीस उप निरीक्षक सावंत, तसेच पो ह, कांबळे, पो ह, राऊत, पो शिपाई होनमाने, आणि पो ह, चालक राठोड यांच्या दक्ष सहकार्याने करण्यात आली.या कारवाईमुळे राज्यात कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ तस्करी साखळीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.