
कानपूर
“सासरेबुआ, तुमच्या मुलीला समजावून सांगा…” अशी विनंती एका जावयाने आपल्या सासऱ्याला केली होती. पण सासऱ्याने उलट मुलीच्याच बाजूने घेतल्याने जावयाचा संताप इतका वाढला की त्याने थेट सासऱ्याचाच खून करण्याचा कट रचला. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
ही घटना कानपूरमधील मुरारीलाल छाती रुग्णालय परिसरातील असून आरोपीचे नाव मोहित तोमर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहितने आपल्या सासऱ्याच्या हत्येसाठी एका कंत्राटी सुपारी किलरला तब्बल ६ लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. एवढंच नाही, तर त्याचा उद्देश स्वतःच्या पत्नी नम्रता आणि मेहुण्यालाही ठार मारण्याचा होता. मात्र तो आपल्या योजनेत यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राजकुमार नावाच्या व्यक्तीचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. तपासादरम्यान उघड झालं की, राजकुमार हा मोहितचा सासरा होता आणि मोहितनेच त्याच्या हत्येचा कट रचला होता.
पोलिस चौकशीत मोहितने कबुली दिली की, “माझ्या पत्नीचे लग्नापूर्वी तीन पुरुषांशी संबंध होते. ती लग्नानंतरही त्यांच्याशी बोलत असे. यावरून आमच्यात सतत वाद व्हायचे. मी ही बाब सासऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी माझ्याच विरोधात बोलत मला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. त्याचा मला प्रचंड राग आला आणि म्हणूनच मी त्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला.”
११ वर्षांचं वैवाहिक आयुष्य आणि सततचे कौटुंबिक कलह, या सगळ्यामुळे मोहितचं मानसिक संतुलन ढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येची सुपारी स्वीकारणाऱ्या ऋषभ नावाच्या तरुणालाही अटक केली आहे