
ठाणे प्रतिनिधी
ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काढलेल्या मोर्चानंतर महापालिकेत मोठा घडामोडीचा सामना झाला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची निवडणूक विभागातून परवाना विभागात बदली करण्यात आली आहे.
मोर्चामध्ये अनधिकृत बांधकाम आणि आगामी मतदारयादीतील संभाव्य घोळ याबाबत बोरसे यांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गट आणि मनसेने आक्षेप घेतला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे शिष्टमंडळाने अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी केली होती.
शिष्टमंडळाच्या या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी निवडणूक विभागातील जबाबदारी बोरसे यांच्याकडून काढून त्यांची परवाना विभागात बदली केली.
माजी खासदार राजन विचारे यांनी मोर्चात म्हटले की, “ठाणे महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असून काही अधिकारी अजूनही भ्रष्ट कार्य करीत आहेत. गोल्डन गँगच्या कारस्थानांपासून शहर वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतदान यादीत घोळ झाला तर संबंधित अधिकाऱ्याला सोडणार नाही.”
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहर विकास विभागात सुरु असलेल्या घोटाळ्याबाबत आयुक्तांना सवाल केला, त्यानंतर महापालिका आयुक्तांनी बोरसे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला.