
अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर परिसरातील मंदिरे फोडून दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली असून, चौघे फरार आहेत. गेल्या वर्षभरात या टोळीने तब्बल १५ मंदिरांची दानपेटी फोडल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर (रा. इंदिरानगर, भोकर, ता. श्रीरामपूर), एकनाथ नारायण माळी (रा. ममदापूर, ता. राहाता, सध्या रा. बिरोबा बन, शिर्डी) आणि शत्रुघ्न मुरलीधर मोरे (रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या टोळीतील राहुल भाऊसाहेब माळी (रा. बिरोबा बन, शिर्डी), पांडू ऊर्फ दत्तू बाबासाहेब मोरे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) आणि त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
करोडी (ता. पाथर्डी) येथील शनिमारुती मंदिरातील दानपेटी फोडून साडेतीन लाखांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सराईत गुन्हेगार राहुल भालेरावला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आणि त्याच्या टोळीने अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण १५ मंदिरांमधील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली.
या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार केले होते. सातत्याने मंदिरांवरील चोरीच्या वाढत्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शनीमारुती मंदिरातील दानपेटी फोडल्यानंतर जणू ‘शनीचा कोप’ टोळीवर झाला आणि त्याच्याच सावटाखाली ती अखेर पोलिसांच्या हाती लागली, अशी चर्चा स्थानिकांत रंगली आहे.