
मिरज, प्रतिनिधी
पोलिस दलातीलच एक कर्मचारी बनावट नोटा तयार करून त्यांची चलनात खपवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी कोल्हापूरातील एका बनावट नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, तब्बल एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ९९ लाख २९ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात चालक म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मिरजेतून सुरू झालेला धागा
महात्मा गांधी चौक पोलिसांनी संशयित सुप्रीत देसाई या तरुणाला मिरजेत पकडले, त्याच्याकडून ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान कोल्हापूरातील मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला.
या टोळीतील राहुल जाधव हा बनावट नोटा तयार करत असे, तर इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे आणि सुप्रीत देसाई हे विविध भागांत त्या नोटा खपविण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीत छापा टाकून जाधवला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे नोटा छपाईचे यंत्रसामग्री आढळली.
सराईत गुन्हेगाराचा मागोवा
संशयित राहुल जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले की, या टोळीने राज्यातील विविध भागात बनावट नोटांचे वितरण केले असावे. या साखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजित पाटील, सर्जेराव पवार आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
अटक केलेले संशयित
या प्रकरणी इब्रार आदम इनामदार (४४, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काडाप्पा देसाई (२२, गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, राजारामपुरी) आणि सिध्देश जगदीश म्हात्रे (३८, मालाड, मुंबई) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
रजेच्या काळात चालवला धंदा
इब्रार इनामदार हा २००६ साली पोलिस दलात भरती झाला होता. तो मोटार विभागात चालक म्हणून कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून तो रजेवर असून, याच काळात बनावट नोटांच्या धंद्यात तो गुंतल्याचे समोर आले आहे. त्याची आई सेवानिवृत्त शिक्षिका असून, भाऊ चांगल्या नोकरीत आहे.
महामार्गावर पकडले आरोपी
मिरज पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पेठनाका परिसरात सापळा रचण्यात आला. मुंबईहून बनावट नोटा खरेदीसाठी आलेल्या सिध्देश म्हात्रेला पोलिसांनी पकडले. त्याला नोटा देण्यासाठी आलेले इब्रार इनामदार आणि नरेंद्र शिंदे मोटारीत बसलेले आढळले. दोघांकडून ९८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
झटपट श्रीमंतीचा मोह
सुप्रीत देसाई हा गडहिंग्लज तालुक्यातील इदरगुच्ची गावचा रहिवासी आहे. वडील माजी सैनिक असून, घरातील परिस्थिती चांगली असतानाही झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी त्याने या टोळीत प्रवेश केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील बनावट चलन रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याची शक्यता आहे.