
सातारा प्रतिनिधी
पावसामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गुरुवारी सकाळी अशाच एका दुर्दैवी घटनेत चार वर्षांच्या मुलीचा जीव गेला. आईच्या मांडीवर बसून जेवत असताना तिच्या पायाला साप चावल्याची घटना घडली. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
केळघर गावातील श्रीशा मिलिंद घाडगे (वय ४) ही चिमुकली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आईसोबत बसून जेवत होती. त्या वेळी अचानक तिच्या पायाला काहीतरी चावल्याने ती जोरात किंचाळली. आईला सुरुवातीला उंदीर असेल असे वाटले. परंतु काही वेळाने घरातील बिळातून साप बाहेर येताना दिसल्याने धास्ती पसरली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी नेले.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला दाखल केले असले तरी योग्य उपचार झाले नाहीत. एवढेच नव्हे, तर केंद्रात दोन रुग्णवाहिका असतानाही त्या उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी कुटुंबीयांना खासगी वाहनाने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय गाठावे लागले. मात्र तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली. आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळेच लहानग्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यांनी आरोग्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन छेडून जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
जावळी तालुका हा अतिपावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात सापांची संख्या वाढते आणि त्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. मात्र, अशा वेळी तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा न मिळाल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे.