
सातारा प्रतिनिधी
सातारा : नवरात्र उत्सव २०२५ निमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाला विशेष गौरव देण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी २५ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत सातारा पोलीस दलाच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेत, अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले.
बैठकीत नवरात्र उत्सवासाठी राबविलेल्या उपाययोजना, मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे तसेच वाहतूक नियंत्रणावर सविस्तर चर्चा झाली. उत्सव काळात अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दलाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
कोल्हापूर परिक्षेत्रातील दुर्गादेवी मूर्ती प्रतिष्ठापनाची आकडेवारी: कोल्हापूर जिल्हा – ११७६, सांगली जिल्हा – १६६४, सातारा जिल्हा – २४०५, सोलापूर ग्रामीण – १००८, पुणे ग्रामीण – १३९९
यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यातील २००५ पासून फरारी असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याबद्दल संबंधित पथकाचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ मध्ये कोल्हापूर परिक्षेत्राला उपविजेतेपद मिळाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सहभागी अधिकारी व अंमलदारांनाही गौरव मिळाला.
बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.