
मुंबई प्रतिनिधी
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच जर सामान्य नागरिकांशी उद्धटपणे वागले तर लोकांचा विश्वास कुठे राहणार? मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील अशाच एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका महिलेवर उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी केवळ तक्रार नाकारलीच नाही, तर शिवीगाळ करत वर्दीवरील बॅच आणि नेमप्लेट फेकून मारल्याचे धक्कादायक दृश्य या व्हिडीओत स्पष्ट दिसते. तक्रारदार महिलेने अधिकाऱ्यांचे नाव विचारले असता हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणानंतर “पोलीस जनतेचे मित्र की शत्रू?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करणाऱ्यांनी गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
काहींनी पोलिसांमधील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारीही अधोरेखित केले. मात्र, “वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे” असा एकमुखी सूर उमटला आहे. “महाराष्ट्रातील अनेक ठाण्यांमध्ये तक्रारींना अशा पद्धतीने झटकून लावले जाते” अशी टीकाही सोशल मीडियावर नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.