
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी (कुठरे) येथील मोनिका पाटील आणि हर्षवर्धन पाटील या सख्या भावंडांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकाच वेळी यश मिळवत राज्य विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाचा वांग खोऱ्यासह जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कुठरे येथील शिक्षक दांपत्य रामचंद्र आणि मीरा पाटील यांची ही दोन्ही मुले लहानपणापासून अभ्यासात हुशार. अधिकारी बनून कुटुंब व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. कठोर परिश्रम व सातत्य यांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी हे बहीण-भाऊ प्रेरणादायी ठरले आहेत.
मोनिका यांनी बी.एस्सी. (ॲग्री) पदवी घेतल्यानंतर २०२० पासून स्पर्धा परीक्षेची वाट धरली. गेल्या वर्षी त्यांनी एमपीएससीत राज्यात मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता आणि पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती. सध्या त्यांचा विवाह काढणे येथील आयटी अभियंता अनिकेत पाटील यांच्याशी झाला असून, त्यांचे सासरे अशोक पाटील हे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहेत.
हर्षवर्धन यांनीही परिश्रम व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करत बहीणीसोबतच विक्रीकर निरीक्षकपदी निवड मिळवली. त्यांच्या या यशामुळे पाटण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.