
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) डिजिटल युगाशी सुसंगत आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, ‘म्हाडा साथी’ (MHADA Sathi) या एआय चॅटबॉट सेवेचे गुरुवारी लोकार्पण केले. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुलजारीलाल नंदा सभागृह, म्हाडा मुख्यालयात या उपक्रमाची अधिकृत सुरुवात झाली.
लोकाभिमुख आणि पारदर्शक सेवा हे म्हाडाचे धोरण असल्याचे सांगून जयस्वाल म्हणाले, “नागरिक सुविधा केंद्र, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली आणि डीजी-प्रवेश या डिजिटल उपक्रमांनंतर आता ‘म्हाडा साथी’ नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.सुरुवातीला ही सेवा म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून लवकरच मोबाईलवरही कार्यान्वित होणार आहे.
चॅटबॉटची वैशिष्ट्ये
* मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत सेवा
* म्हाडाच्या नऊ विभागीय मंडळांशी संबंधित माहिती
* आवाजावर आधारित संवादाची सुविधा
* कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रतिसाद
या चॅटबॉटद्वारे संगणकीय सोडती, गृहप्रकल्प, अर्जांची सद्यस्थिती, निविदा सूचना आणि नियमावली यांसह विविध माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. कार्यालयीन दगदग कमी होऊन वेळेचीही बचत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जयस्वाल यांनी सांगितले की, नागरिक सुविधा केंद्रावर प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या घटून आता केवळ सात ते आठ मिनिटांवर आला आहे. पुढील टप्प्यात घरबसल्या दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल. सध्या म्हाडाच्या संकेतस्थळावर तब्बल १५ कोटी दस्तऐवज उपलब्ध असून त्यामुळे माहिती अधिकारांतर्गत होणाऱ्या अर्जांची संख्याही कमी झाली आहे.
लोकार्पणप्रसंगी मुंबई इमारत सुधार व पुनर्विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
म्हाडा साथी’च्या माध्यमातून म्हाडा पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्रित प्रशासनाच्या दिशेने सक्षम पाऊल टाकत असून, भविष्यातील डिजिटल उपक्रमांना नवा वेग मिळणार आहे.