
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरात सुमारे ७८ एकर क्षेत्रफळावर वसलेल्या चित्रनगरीत लवकरच विकासकामांची नवी पहाट दिसणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी येत्या महिनाभरातच १० ते १५ कोटी रुपयांची कामे सुरू होणार असल्याची घोषणा केली. याचबरोबर, येथे चित्रपट विषयक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा प्रयत्नही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
चर्चासत्रात घोषणा
हॉटेल सयाजी येथे चित्रनगरी विकास विषयक आयोजित चर्चासत्रात शेलार बोलत होते. या वेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, अभिनेते-कवी सौमित्र (किशोर कदम), अभिनेते सागर तळाशीकर, विचारवंत उदय नारकर, सिनेअभ्यासक प्रा. कविता गगराणी, दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘स्क्रिप्ट टू प्रिंट’ संकल्पना
कोल्हापूर चित्रनगरी ही केवळ पर्यटनकेंद्र न राहता अद्ययावत चित्रपटसृष्टीचे केंद्र व्हावी, यासाठी प्रयत्न होणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. “स्क्रिप्ट टू प्रिंट” ही संकल्पना राबविण्यासाठी विभाग कार्यरत राहील. निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.
मान्यवरांची मते
किशोर कदम : कोल्हापूरला कान्स फिल्म फेस्टिव्हलप्रमाणे जागतिक ओळख मिळावी.
सागर तळाशीकर : पर्यटन नव्हे, तर प्राथमिक सुविधा हा विकासाचा गाभा असावा.
प्रा. कविता गगराणी : कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाशी निगडित कामे व्हावीत.
उदय नारकर : जागतिक तंत्रज्ञान येथे उपलब्ध होण्यासाठी शासनाने मदत करावी.
सचिन सूर्यवंशी:महसूल नव्हे, तर कला बळकट होणे हा उद्देश असावा.
रोजगार व विकास
सध्या चित्रनगरीत सुमारे २०० जणांना रोजगार उपलब्ध असून विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.
भविष्यातील चित्रनगरी कशी असावी, याचे संकल्पचित्र उभे करण्यासाठी सिनेप्रेमी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.