
सातारा प्रतिनिधी
सातारा| चोरीस गेलेले दागिने आणि हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात मल्हारपेठ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ५ लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तो मालकांच्या ताब्यात देण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाद्वारे ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे १०.२५ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
याचबरोबर हरवलेल्या मोबाईल शोधण्यासाठी एपीआय चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते. सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे १० मोबाईल मिळवण्यात आले.
मिळालेला संपूर्ण मुद्देमाल एपीआय चेतन मछले यांनी मालकांच्या ताब्यात दिला. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
या कामगिरीत एपीआय चेतन मछले, पीएसआय रामराव वेताळ, एपीआय अंकुशी, पो.हवा. पगडे, सारुख, सचिन पाटील, शिपाई सिध्दनाथ शेडगे, अमोल पवार, अमोल पिसे आणि सायबर पोलिस ठाण्याचे शिपाई महेश पवार यांनी सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले.