
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात घडलेल्या एका विलक्षण घटनेने जिल्हा रुग्णालयात आनंदाचा माहोल निर्माण केला आहे. कोरेगाव तालुक्यातील माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय 27) या तरुणीने शुक्रवारी संध्याकाळी एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. याआधी पाच वर्षांपूर्वी तिने तीन जुळी बाळं जन्माला घातली होती. अशा प्रकारे तिच्या आयुष्यात एकूण सात बाळांचा जन्म झाला असून, याची चर्चा आता साताऱ्यासह राज्यभरात रंगू लागली आहे.
ही अवघड डिलिव्हरी सिझरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. मात्र डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण हस्तकौशल्यामुळे आई आणि सर्व बाळं सुखरूप आहेत. या प्रसंगासाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने परिश्रम घेतले. सुरुवातीला काहीशी धाकधूक होती; पण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने नातेवाईकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या काजलचा पती विकास खाकुर्डिया हा सध्या पुणे जिल्ह्यातील सासवड येथे गवंडी म्हणून काम करतो. त्यांच्या घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे.
एका मातेच्या पोटी इतक्या कमी कालावधीत सात बाळं जन्माला आल्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. त्यामुळेच या घटनेला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डची टक्कर देईल, अशी चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे.
एका गवंड्याच्या घरात नव्या पर्वाची सुरूवात झाली असून, साताऱ्यात या चमत्काराने आनंदाचा उत्सवच साजरा होत आहे.