
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | खेरवाडी पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात तब्बल २५ दिवसांच्या अथक पाठपुराव्यानंतर सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या. मोहम्मद अली फिरोज जाफरी उर्फ मोमो इराणी (२३, रा. मुंब्रा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफिल्ड हंटर ३५० मोटारसायकल व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.
५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चेतना कॉलेजसमोरील बसस्टॉपवर ही घटना घडली होती. सेवानिवृत्त सतीश आत्माराम परब (६८) यांच्या गळ्यातील तब्बल ४५ ग्रॅम सोन्याची चैन (किंमत सुमारे ₹३.५ लाख) दोन इसमांनी जबरदस्तीने खेचून नेली. या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळापासून ते मुंब्र्यापर्यंत तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अखेर १ सप्टेंबर रोजी मोमो इराणी मुंब्रा येथे मोटारसायकलसह दिसल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदार हबीब इराणी याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून रॉयल एनफिल्ड हंटर मोटारसायकल (₹१.५ लाख) आणि वनप्लस मोबाईल (₹२० हजार) असा एकूण ₹१.७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही तुर्भे, कळंबोली, मुंब्रा आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दरोडा, मारहाण आणि शस्त्रबंदी उल्लंघनाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
ही धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, परिमंडळ ८ चे उपायुक्त मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास अधिकारी, पो.उ.नि. प्रदीप लोंढे
तपास पथक, पो.उ.नि. सचिन पाटील, पो.ह. मोरे, पो.ह. सावंत,पो.ह. पवार, पो.ह. ठोंबरे, पो.ह. ठाकरे, पो.शि. कांबळे, पो.शि. पाटील, पो.शि. यादव, पो.शि. सावंत, पो.शि. जगताप, पो.शि. गायकवाड