
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत किरकोळ कारणावरून उभा राहिलेला वाद किती जीवघेणा ठरू शकतो याचे धक्कादायक उदाहरण मालाडमध्ये समोर आले आहे. गुरुकृपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मालाड पश्चिमेतील चिंचोली बंदर भागात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणावरून झालेल्या किरकोळ वादानंतर संजय मकवाना याने आपले चार मित्र घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर पाच जणांनी मिळून कल्पेश भानुशालीवर लाथाबुक्क्यांनी तसेच
बिअरच्या बाटल्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत भानुशालीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
“जर बार इतक्या उशिरापर्यंत सुरू नसता, तर माझ्या भावाचा जीव वाचला असता,” अशी प्रतिक्रिया मृताचा भाऊ परेश भानुशाली याने दिली.
या प्रकरणी मालाड पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी दिली.