
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव आज होणार आहे. हा लिलाव पारंपरिक पद्धतीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत लालबाग मार्केटमधील मंडपात पार पडणार आहे.
दरवर्षी हजारो भाविक ‘लालबागच्या राजा’च्या चरणी दागदागिने, नाणी आणि मौल्यवान अर्पणे ठेवतात. मंडळाच्या वतीने हा सर्व दागिन्यांचा लिलाव पारदर्शक रितीने करून मिळणारी रक्कम विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये खर्च केली जाते.
मागील वर्षी झालेल्या लिलावात जवळपास ४० किलो सोने,चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. त्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला होता. हा निधी ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी उपकरणे खरेदी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच आपत्तीग्रस्तांना मदत यासाठी वापरण्यात आला होता.
लालबागचा राजा मंडळाने यावर्षीच्या लिलावासाठीही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिलावात व्यापारी, सराफ, तसेच सर्वसामान्य भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.