
पुणे प्रतिनिधी
राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७ लाख २९ हजार ७६२ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले आहेत. आधार नोंदीतील विसंगतींमुळे ही समस्या उद्भवली असून, यासाठी शाळांना ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
नोंदणी अपूर्णच
राज्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या २.०५ कोटी इतकी आहे. त्यापैकी ५ लाख २७ हजार ३०१ विद्यार्थी अजूनही आधार नोंदणीपासून वंचित आहेत. आतापर्यंतच्या प्रक्रियेत ९३.५३ टक्के कामकाज पूर्ण झाले असले, तरी त्रुटी व अपूर्ण नोंदींमुळे अनेक विद्यार्थी लाभ योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
संचमान्यतेवर परिणाम
सरल प्रणालीतील आधार नोंदीत झालेल्या मिसमॅचमुळे समस्या निर्माण झाली आहे. संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येच्या आधारे ठरणार असल्याने शाळांना विद्यार्थ्यांचे आधार अपडेट तातडीने पूर्ण करणे बंधनकारक आहे.
गटसाधन केंद्रांना आदेश
प्रत्येक गटस्तरावर दोन आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नादुरुस्त संच वगळता उर्वरित संचांचा वापर करून प्रलंबित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्या आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दररोजचा आढावा घेऊन ऑपरेटरमार्फत काम पूर्ण करावे, असेही सांगण्यात आले आहे.
आधार नोंदणीची आकडेवारी
* एकूण विद्यार्थी संख्या – २,०५,१५,६७९
* आधार नोंदणी पूर्ण – १,९९,८८,३७८
* आधार पडताळणी पूर्ण – १,९१,८७,९४३
* बायोमेट्रिक अपडेट प्रलंबित (५–१५ वर्षे) – ३८,८८,५९७
* बायोमेट्रिक अपडेट प्रलंबित (१५ वर्षांवरील) – २,३५,७१,१६०