
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाच-गाणी, ढोल-ताशांचा जल्लोष सुरू असतानाच, शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचं यंत्रणादेखील अविरत राबत होतं. तब्बल २५ तासांच्या कामानंतर रविवारी पहाटे मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात आला. मिरवणुकीनंतर रस्त्यांवर पडलेल्या दहा ट्रॉली चपला आणि प्रचंड प्रमाणातील कचरा महापालिकेने तातडीने उचलला.
बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश, रंकाळा वेश, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका, इराणी खाण अशा ठिकाणी प्रचंड चपला व कचऱ्याचे ढिग साचले होते. परंतु महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटेपासूनच रस्ते झाडून, ट्रॅक्टरमधून चपला-कचरा उचलून मार्ग मोकळा केला.
या मोहिमेत आरोग्य, पवडी, विद्युत, उद्यान अशा विभागांतील तब्बल तीन हजार कर्मचारी शिफ्टनुसार तैनात होते. कृत्रिम विसर्जन कुंडे, इराणी खण याठिकाणी वैद्यकीय पथकं, अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक, क्रेन चालक, हमाल असे शेकडो जण कार्यरत होते. विविध भागांतून आलेल्या मूर्तींसाठी १०० टेम्पो व ४१५ हमालांची नेमणूक करण्यात आली होती.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, कपिल जगताप, परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे यांच्यासह अनेक अधिकारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, शहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, नगरसचिव सुनील बिद्रे यांच्यासह मोठा अधिकारी वर्ग मिरवणूक मार्ग व खणांवर उपस्थित होता.
महापालिकेच्या सर्व विभागांनी अहोरात्र काम करत मिरवणुकीनंतर काही तासांतच शहर पुन्हा स्वच्छ व निर्मळ केले. या कामगिरीबद्दल प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभार मानले.