
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांची मोठी गर्दी आझाद मैदान परिसरात जमली आहे.
या आंदोलकांना नाश्ता, जेवण, पाणी पुरवण्यासाठी विविध संघटना पुढे येत आहेत. मात्र आंदोलकांसाठी जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या पोलिस अधिकाऱ्याने अटल सेतुवर अडवल्याने वाद निर्माण झाला. यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारत संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
दरम्यान, बाहेरून आलेल्या आंदोलकांना मदत करण्यासाठी मुंबईकरही पुढे सरसावले आहेत. स्थानिक मराठा बांधव स्वतःहून नाश्ता, जेवण बनवून देत असून अनेक ठिकाणी गाड्यांवर बॅनर लावून तसेच सोशल मीडियावर संदेश देऊन मदतीचे आवाहन सुरू आहे.
रात्री उशिरा मात्र एक वेगळीच घटना घडली. पहाटे दोनच्या सुमारास एका संशयित व्यक्तीने जरांगे पाटील यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून जरांगे पाटील भडकले आणि या व्यक्तीची चौकशी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. चौकशीत तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. “असा कोणी आमचा कार्यकर्ता नाही,” असे ठणकावून सांगत जरांगे पाटील यांनी पोलिसांची गैरहजेरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.