
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला निर्णायक कलाटणी मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. “उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे,” अशी घोषणा त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढणार असून राज्य सरकारवर तातडीने दबाव येणार आहे.
“७० वर्षांची फसवणूक”
“गेल्या ७० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही. आज लाखो गरीब मराठे मुंबईत आले आहेत. ही गर्दी नसून, आमची वेदना आहे. गोरगरीबांच्या लेकरांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक मुंबईकडे येत असून, त्यांना काही सूचना करताना जरांगे म्हणाले, “राज्यातील गरीब मराठे रेल्वेने आझाद मैदानावर पोहोचावेत. गाड्या थेट मैदानावर न आणता पार्किंगमध्ये ठेवाव्यात. आझाद मैदानाभोवतीची २९ मैदाने आधीच फुल झाली आहेत.”
अन्नछत्रावरून इशारा
आंदोलनकर्त्यांना आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले, “जेवण घेऊन येत असाल, तर ते पार्किंगमध्येच वाटप करा. कोणी उपाशी राहू नये. अन्नछत्रासाठी पैसे मागू नयेत. गरीबांच्या वेदनेवर कोणी धन उपार्जन करणार असेल, तर त्यांची नावं मी माध्यमांत जाहीर करेन.”
एका नेत्यावर थेट टीका
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी एका नेत्यावर थेट हल्ला चढवला. “लोकसभा निवडणुकीतसुद्धा तू लोकांकडून पैसे घेतलेस. डिझेल खर्चासाठी पैसा उकळलास. रेनकोट वाटताना देखील पैसा घेतलास. हे सर्व लोकांना ठाऊक आहे. मराठ्यांनी आता कोणालाही पैसा द्यायचा नाही,” असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटलांच्या ‘उद्यापासून पाणी बंद’ या निर्णयामुळे आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, सरकारसमोर निर्णायक कसोटी उभी राहणार आहे.