
मुंबई प्रतिनिधी
राजधानी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनात शनिवारी आणखी एका कार्यकर्त्याचा करुण अंत झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव गावचा रहिवासी विजय घोगरे (वय ३८) या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला तातडीने जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे हजारो बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. ‘‘आरक्षणाशिवाय माघार नाही’’ अशी भूमिका घेतलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने वातावरणात हळहळ व्यक्त होत आहे.
याआधीही पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सतीश देशमुख या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे अल्पावधीत दोन आंदोलकांचा बळी गेल्याने या आंदोलनाची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
जरांगे पाटील ठाम
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ‘‘मराठा समाजाला कुणबी घोषित करण्याचा आदेश तत्काळ अमलात आणावा, अन्यथा आंदोलन थांबवणार नाही,’’ असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने १३ महिने अभ्यास केला आहे. ‘‘आता अहवाल द्या. उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या,’’ अशी मागणी जरांगे यांनी शासनाकडे केली. ‘‘मराठवाड्यातील १ लाख २३ हजार कुणबी नोंदी कुठे गेल्या?,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राज्य सरकारकडून शिष्टमंडळाच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे; मात्र जरांगे पाटील सध्या कोणतीही मुदतवाढ देण्यास तयार नाहीत.