
मुंबई प्रतिनिधी
तिकीट खिडकीपाशी रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलेली मोठी सोय आता इतिहासजमा होत आहे. पश्चिम रेल्वेकडून स्थानकांवर लावण्यात आलेल्या क्युआर कोडद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा बंद करण्यात आल्याचे समजते.
ही सेवा सुरू करताना प्रवाशांना धावपळीशिवाय मोबाईलवरून तिकीट मिळावे, हीच भूमिका होती. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूटीएस अॅपमधून स्टेशन परिसरातील क्युआर कोड स्कॅन करून तिकीट बुक करता येत होते. पण या सोयीचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले.
अनेक प्रवासी तिकीट न घेता थेट गाडीत चढतात आणि त्यानंतर धावत्या गाडीतच कोड स्कॅन करून तिकीट काढतात. त्यामुळे रेल्वेला महसुली तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.
सध्या पश्चिम रेल्वेच्या ३० स्थानकांवर १०० ते १२५ क्युआर कोड कार्यरत होते. मात्र ते आता निष्क्रिय करण्यात आले आहेत. फक्त पश्चिम रेल्वेच नव्हे तर मध्य रेल्वेकडूनदेखील हीच सोय बंद करण्याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र पाठविण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी डिजिटल तिकीटिंगची सोय कमी होणे ही मागे जाणारी पावले असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र “गैरवापर थांबविण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य होता” असे स्पष्ट केले आहे.