
धुळे प्रतिनिधी
धुळे शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून दानपेटी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
शनिवारी पहाटे मंदिरात शिरून दानपेटी लंपास करण्यात आली होती. सकाळी भक्तांच्या लक्षात हा प्रकार येताच पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवले. गुप्त माहितीच्या आधारे अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला. मोटारसायकलवरून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून ताबा घेतला.
साहिल सत्तार शाह आणि सोहेल आरिफ शाह अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून, दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मंदिरातून चोरलेली दानपेटी आणि चोरीची मोटारसायकल असा मिळून तब्बल ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त झाल्याचे उघड झाले.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, आरोपींकडून आणखी गुन्ह्यांचे पडसाद उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.