
सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पुणे–बंगळूर महामार्गासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक संथ झाली असून काही दुर्गम भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या तालुक्यांतील शाळांना २० व २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटण या तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी दक्ष रहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाई येथे धोम धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे शहरातील महागणपती पुलावर पाणी वाहत असून वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी पुलाचा वापर केला जात आहे. तरीदेखील शहरात मोठ्या प्रमाणावर कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावरही वाहने संथ गतीने चालू आहेत. सातारा शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना धरणातून ८०,५०० क्युसेक, धोमधून १४,५१०, बलकवडी १०,५६६, कण्हेर १५,०००, तारळी ३,५००, उरमोडी ६,१५५ आणि वीर धरणातून ४२,७३४ क्युसेक विसर्ग सुरू होता. या विसर्गामुळे वाई गणपती घाट, चिंधवली, मर्ढे, खडकी, हमदाबाज कीडगाव, करंजे म्हसवे आदी भागांतील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांनी या मार्गांचा वापर करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मौजे शिरगाव येथील विकास बापू कापडे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
पावसाच्या स्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने प्रशासन हायअलर्टवर असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.