
सातारा प्रतिनिधी
मोठी स्वप्नं फक्त महानगरातच जन्म घेतात, असं समजणाऱ्यांनी आता साताऱ्याकडे पाहावं! शाहूपुरीतल्या साध्या घरातून, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला सोहम घोलप गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान साम्राज्यात थेट प्रवेश करतोय… तेही संभाषणात्मक एआय सल्लागारपदी आणि तब्बल ४० लाखांच्या वार्षिक पॅकेजसह!
ही कहाणी फक्त नोकरीची नाही, ही आहे कष्टाची, झुंजीची, आणि स्वतःवरच्या विश्वासाची!
२०२२ साली गजवडीतील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमधून संगणक अभियांत्रिकी पूर्ण केल्यावर, सोहमने गाडी सरळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मार्गावर वळवली. आरामदायी करिअरच्या वाटा नाकारत त्याने नवं शिकण्याचं, नव्या तंत्रज्ञानात झोकून देण्याचं ठरवलं… आणि तिथेच त्याने स्वतःची किंमत सिद्ध केली.
गुगलसारख्या कंपनीत प्रवेशासाठी हजारो जण धडपडतात, पण साताऱ्याच्या मातीत वाढलेल्या या मुलाने स्वतःच्या प्रतिभेवर आणि मेहनतीवर टेकून ते स्वप्न उराशी घट्ट पकडलं… आणि शेवटी ते साकार केलं.
“गुगलमधील हे यश केवळ सोहमचं नाही, तर साताऱ्यातल्या प्रत्येक स्वप्नाळू डोळ्याचं आहे,” असं ज्ञानश्री कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक रोहित वांगडे ठामपणे म्हणाले.
ज्ञानश्री इन्स्टिट्यूटने याआधी टाटा मोटर्स, टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, मर्सिडीज-बेन्झसारख्या दिग्गज कंपन्यांत विद्यार्थी पाठवले आहेत, पण गुगलमधील ही भरारी संस्थेच्या अभिमानाला नवी उंची देणारी आहे.
सोहम घोलपच्या या झेपेने एक गोष्ट स्पष्ट झाली — मेहनत, जिद्द आणि ध्येयावरचा अढळ विश्वास असेल, तर गाव कुठलं, पार्श्वभूमी कशी… याला काहीही महत्त्व नसतं!