
सातारा प्रतिनिधी
“सरकारी काम अन् सहा महिने थांब” ही म्हण अनेकांना प्रत्यक्ष अनुभवास येते. शासकीय कार्यालयात चकरा मारणं, रकान्यांतून फिरणं आणि फोन केला तरी प्रतिसाद न मिळणं, हे सामान्य नागरिकांचं रोजचं वास्तव. मात्र, साताऱ्यात एका अजब योगायोगाने घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. एका वकिलाच्या 7/12 दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या फोन कॉलला थेट पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी स्वतः उचललं आणि काही क्षणांतच काम मार्गी लावण्याचे आदेशही दिले!
ही घटना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. पालकमंत्री देसाई पत्रकार परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. परिषद सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर असलेल्या लँडलाईन फोनवर कॉल आला. रिंग वाजत असताना उपस्थित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र शंभुराज देसाई यांनी तो फोन उचलला.
फोनवर असलेली व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारत असल्याची तक्रार करत होती. तिने समोरच्या व्यक्तीला जिल्हाधिकारी समजून आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर खुद्द शंभुराज देसाई यांनीच, “मी जिल्हाधिकारी नाही, पालकमंत्री शंभुराज देसाई बोलतोय,” असं सांगत संबंधित व्यक्तीला क्षणभर धक्का दिला.
यानंतर मंत्री महोदयांनी तात्काळ प्रांताधिकाऱ्यांना फोन करून संबंधित व्यक्तीचं काम तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, शंभुराज देसाईंच्या कार्यपद्धतीची स्तुती होत आहे.