
पुणे प्रतिनिधी
रोहित पवारांनी घेतली पीडित तरुणींची भेट; संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी
पुण्यातील कोथरूड परिसरात तिन्ही तरुणींवर पोलिसांकडून जातीवाचक भाषा वापरल्याचा गंभीर आरोप होत असून, न्याय मिळावा यासाठी पीडितांनी थेट पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या धरला आहे.
घटनेत, छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुणी सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला कोथरूड येथील तीन तरुणींनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एक दिवस आसरा दिला. दुसऱ्या दिवशी ती निघून गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी ‘सून हरवली’ची तक्रार दिली. माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस पुण्यात आले आणि कोथरूड पोलिसांसोबत त्या फ्लॅटवर धाड टाकून तिन्ही तरुणींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
पीडित तरुणींचा आरोप आहे की, चौकशीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक भाषा वापरली आणि कोणतीही चूक नसताना त्यांना बराच वेळ ठाण्यात बसवून ठेवले. “नाहक त्रास दिला गेला, त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तालयासमोर येऊन पीडितांची भेट घेतली. पवार म्हणाले, “या मुलींची काहीही चूक नसताना पोलिसांनी घरात घुसून अयोग्य भाषा वापरली. या तरुणी कित्येक तास न्यायासाठी इथे बसल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
संपूर्ण घटनेमुळे पुणे पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आयुक्तालयात याबाबत पुढील कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.