
पीएसआय प्रेमा पाटील आणि पीएसआय कामटेवर शारीरिक-मानसिक छळाचे गंभीर आरोप; सुप्रिया सुळे यांची गृहमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी
पुणे प्रतिनिधी
शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पोलीस ठाण्यातील धक्कादायक वर्तणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात तीन तरुणींवर जातीवाचक वक्तव्य, चारित्र्यहनन आणि शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या…
— Supriya Sule (@supriya_sule) August 2, 2025
घटना कशी घडली?
छत्रपती संभाजीनगर येथील एका मुलीने सासरीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे एका दिवसासाठी आसरा घेतला होता. यावेळी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल झाली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील कोथरूड येथील फ्लॅटवर छापा टाकून तिन्ही मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
रिमांड रूममध्ये मारहाण व अपमान
श्वेता एस. यांनी शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, रात्री उशिरा पोलिसांनी मुलींना कोथरूड पोलीस ठाण्याच्या रिमांड रूममध्ये नेऊन बेदम मारहाण केली. त्यांना काही तास तिथेच ठेवण्यात आलं आणि शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
जातीवाचक वक्तव्य व अश्लील प्रश्न
श्वेता एस. यांच्या आरोपानुसार, पीएसआय प्रेमा पाटील यांनी मुलींना उद्देशून,
“तुमची जातच तशी आहे, तू किती जणांसोबत झोपली आहेस?, तू तर रां# आहेस”असे अपमानास्पद शब्द उच्चारले.
तर, पीएसआय कामटे यांनी केवळ लाथाबुक्क्यांनी मारहाणच केली नाही, तर मुलीच्या शरीराला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप आहे. याशिवाय,
“दोघींचे स्कार्फ सेम आहेत, तुम्ही लेस्बियन आहात का?”, “तुम्ही दारू पिता का?”, “तुला तर काय बाप नाही म्हणून सोडलं असेल”
असेही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचे श्वेता यांनी सांगितले.
राजकीय पातळीवर प्रकरण गाजलं
घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
“जर हा व्हिडिओ घटनेशी संबंधित असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी सुळे यांनी केली.
पीडितांचा इशारा
श्वेता एस. यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“पोलिसांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही, तर आम्ही हे प्रकरण थांबवणार नाही.”