
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत एम.एल. डहाणूकर मार्ग, कारमायकल रोडवरील निला हाऊसजवळील फूटपाथवर सोमवारी रात्री (२२ जुलै) झालेल्या भांडणातून ५६ वर्षीय अरविंद आत्माराम जाधव यांची निर्घृण हत्या झाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी वेदप्रकाश कौशल मिश्रा (४१) याने जुन्या वादातून राग धरून जाधव यांच्या डोक्यावर बोथट हत्याराने वार करून त्यांचा खून केला. या प्रकरणी मयताचे भाऊ अनिल आत्माराम जाधव (५१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक तपास, साक्षीदारांच्या जबाबांद्वारे व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. महालक्ष्मी मंदिर परिसरातून मिश्रा याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत रात्री ९ वाजता त्याला अटक करण्यात आली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.