
नालासोपारा प्रतिनिधी
नालासोपारा|अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणारा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. गडगापाडा (पूर्व) येथील ओम साई निवासस्थानी विजय चव्हाण (३५) यांचा मृतदेह घरातच गाडल्याचा आरोप त्यांची पत्नी कोमल चव्हाण (२८) व शेजारी तरुण मोनू शर्मा यांच्यावर आहे. दोघेही सध्या फरार असून पेल्हार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
विजय चव्हाण मागील सुमारे १५ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे दोन भाऊ त्यांचा शोध घेत असताना, दोन दिवसांपूर्वी कोमल चव्हाणही अचानक बेपत्ता झाली. त्याच वेळेस शेजारी राहणारा मोनू शर्मा गायब झाल्याने परिसरात चर्चा व संशय अधिकच वाढला. कोमल आणि मोनू यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी विजयबाबत अनिष्टाची भीती व्यक्त केली.
सोमवारी सकाळी विजयचे भाऊ ओम साई निवासस्थानी गेले असता घरातील जमिनीवरील काही टाईल्सचा रंग व बसवणी वेगळी भासली. संशय आल्याने त्यांनी त्या टाईल्स काढल्या असता आत कपड्याचा (बनियन) तुकडा दिसला आणि तीक्ष्ण दुर्गंधी सुटली. तातडीने पोलिसांना कळविण्यात आलं.
सूचना मिळताच पेल्हार पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराचा भाग सीलबंद केला आणि लाद्या उचकून शोधमोहीम सुरू केली. प्राथमिक पाहणीत जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृतदेहाची ओळख, मृत्यूचं कारण व घटनाकाल निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक संघाला पाचारण करण्यात आलं असून शवविच्छेदनाचा अहवाल निर्णायक ठरणार आहे.
या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी पत्नी कोमल चव्हाण व मोनू शर्मा यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकांना रवाना करण्यात आलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन रेकॉर्ड्स आणि शेजाऱ्यांच्या जबाबांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून कळते.
घटनेने नालासोपारा परिसरात खळबळ माजली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीवरूनच निष्कर्ष काढू नका, अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा करा, अशी विनंती पोलिसांनी नागरिकांना केली आहे.