
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! लाखो प्रवाशांच्या नाडीवर हात ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लोकल रेल्वेसेवा मेट्रोसारखी एसी होणार असून, त्यासाठी प्रवाशांच्या खिशावर एक रुपयाचाही भार टाकला जाणार नाही. लोकल डबे पूर्णतः नवीन असतील, एसी असतील आणि दरवाजे स्वयंचलित बंद होणारे असतील, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला.
मुंबईच्या उपनगरांमध्ये वाढत चाललेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, “मुंब्रामध्ये नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली. लोकल डब्यांना दरवाजे नसल्यामुळे अशा दुर्घटना घडतात. प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. मेट्रोप्रमाणेच सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची संधी आता लोकल प्रवाशांनाही मिळणार आहे. आणि तेही तिकिटात एक रुपयाचीही वाढ न करता.”
नवीन डबे, नव्या सुविधा – प्रवाशांसाठी गेमचेंजर
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, हे डबे जुन्या डब्यांवर फक्त रेट्रोफिटिंग करून नव्हे, तर संपूर्ण नवीन पद्धतीने बनवले जाणार आहेत. एसी डबे, स्वयंचलित दरवाजे, सुरक्षित आणि अत्याधुनिक सोयी – ही लोकल प्रवासातील क्रांती ठरणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्याचबरोबर, “या योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली असून, केंद्र सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा मुंबईत केली जाईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मेट्रो ३ संपूर्ण मार्ग ऑक्टोबरअखेर सुरु; एकच तिकीट, सर्व प्रवास
या घोषणेसोबतच मेट्रोप्रकल्पाबाबतही मुख्यमंत्र्यांनी उत्साहवर्धक माहिती दिली. “मेट्रो ३ चे दोन टप्पे आधीच कार्यान्वित झाले असून, ऑक्टोबर अखेरीपर्यंत कुलाबा ते आरे संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल. विक्रोळी ते मंडाले, ठाणे ते कल्याणसह अन्य १३ मेट्रो मार्ग वेगात सुरू आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय एकात्मिक तिकीट प्रणालीच्या माध्यमातून एकाच तिकिटावर मेट्रो, लोकल, मोनोरेल, बेस्ट आणि वॉटर ट्रान्सपोर्टने प्रवास करता येणार आहे. “हे तिकीट व्हॉट्सअपवरही मिळणार आहे,” असे सांगतानाच त्यांनी मिश्कीलपणे टोला हाणला की, “तिकिट व्हॉट्सअपवर मिळेल, पण निवडणुकीचं तिकीट मात्र नाही!”
मुंबईचा प्रवास आता होणार स्मार्ट आणि सुरक्षित; जनता म्हणते – ‘हीच ती परिवर्तनाची गाडी!’
हे सर्व बदल केवळ पायाभूत सुविधांचा भाग नसून, मुंबईच्या लाखो प्रवाशांच्या रोजच्या जीवनातला मोठा सकारात्मक फरक ठरणार आहेत. ‘एसी लोकल’ ही केवळ घोषणा नाही, तर मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याची सुरुवात ठरणार आहे, असाच सूर सर्वसामान्य मुंबईकरांनी व्यक्त केला.