
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई |मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय अपहरण व खंडणी टोळीचा पर्दाफाश करत बळी इसमाची सुखरूप सुटका केली आहे. तब्बल एका महिन्याच्या तपासानंतर ही मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.
दि. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास ओशिवरा, जोगेश्वरी (प.) येथील हॉटेल अलीबाबा परिसरातून दोन इसमांचे तीन वेगवेगळ्या कारमधून जबरदस्ती अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी या इसमांना रायगड जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर नेऊन त्याठिकाणी अमानुष मारहाण करत खंडणीची मागणी केली होती.
सदर प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात १० जुलै रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांचा माग काढला असता, आरोपी हे बळी व्यक्तीसह रायगड, नाशिक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व दिल्ली येथे हालचाली करत असल्याचे निष्पन्न झाले.
सदर टोळीतील आरोपी हे याआधीही अंमलीपदार्थ विक्री, खंडणी, अपहरण, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या ६ पथकांना विविध राज्यांमध्ये रवाना करण्यात आले होते.
या पथकांनी १५ जुलै रोजी रात्री उत्तरप्रदेशमधील बांदा येथून ३ आरोपींना अटक केली. तर उर्वरित ४ आरोपींना मुंबई व रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून अपहरणात वापरण्यात आलेली वाहने, मोबाईल फोन, डोंगल आदी महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३२ ते ४३ वयोगटातील एकूण ७ पुरुषांचा समावेश आहे. ही टोळी गेल्या महिन्याभरापासून बळी व्यक्तींना अमानुष मारहाण करून जबरदस्ती खंडणी उकळत होती.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन व सहा. पोलीस आयुक्त (मध्य) सुनील चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी परिश्रम घेतले.
ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींवर मोठा आघात ठरणारी असून गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.