
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | चेंबूरमधील छेडानगर परिसरात मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट ६ ने गुप्त माहितीवरून धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुलं आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
क्राईम ब्रँच युनिट ६ ला माहिती मिळाली होती की, जीएम रोड परिसरात दोन संशयित तरुण शस्त्रासह थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश कुमार महेंद्र कुंभार उर्फ गुडडू आणि अमित सुदीर शर्मा यांचा समावेश आहे. दोघेही उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे दोघे मुंबईत कोणावर तरी प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने आले असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून, शस्त्र पुरवठ्याचे स्त्रोत, संभाव्य उद्दिष्ट व्यक्ती आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. क्राईम ब्रँच युनिट ६कडून पुढील तपास सुरू आहे.