
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | नागपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्रीवर मोठा घाला घालत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटने एक धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३०७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा उच्च दर्जाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रॉनची अंदाजित बाजारमूल्य ७६.७५ लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई १० जुलै रोजी नागपाडा येथील एम.एस. अली रोड परिसरात करण्यात आली. पोलिसांना अंमली पदार्थ विक्रीसंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३०७ ग्रॅम एम.डी. आढळून आला. त्यानंतर संबंधित आरोपीविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत या आरोपीकडून नागपाडा परिसरात मेफेड्रॉन विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचं नेतृत्व प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे (बांद्रा युनिट) यांनी केलं. त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई अचूकतेने पार पाडली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थांची माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📞 अंमली पदार्थ विरोधी कक्ष: ९८१९१११२२२
📞 एनसीबी हेल्पलाइन ‘मानस’: १९३३
मुंबई पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थविरोधी मोहिमेला निश्चितच बळकटी देणारी ठरली असून, शहरात अंमली पदार्थांचं साखळीचं जाळं उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक दक्ष झाले आहेत.