
मुंबई प्रतिनिधी
१ जुलै २०२५ — नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांना झटका देणारे एकापेक्षा एक नवे नियम लागू होणार आहेत. करदात्यांपासून प्रवाशांपर्यंत सर्वांनाच या नियमांचा फटका बसणार आहे.
रेल्वे तिकिट दरवाढ, जीएसटी रिटर्नच्या अटी कठोर, UPI व्यवहारांमध्ये चार्जबॅकचे नवे धोरण, तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये आधार पडताळणी बंधनकारक आणि पॅन कार्डसाठी आता आधार अनिवार्य — हे सर्व बदल १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत.
रेल्वे प्रवास महागणार, भाड्यात ‘हळूच’ वाढ
भारतीय रेल्वेकडून १ जुलैपासून प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ केली जाणार आहे.
नॉन-एसी मेल व एक्सप्रेस ट्रेनसाठी १ पैसे प्रति किलोमीटर आणि एसी क्लाससाठी २ पैसे प्रति किलोमीटर दरवाढ प्रस्तावित आहे.
ही वाढ केवळ ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा थेट फटका बसणार आहे.
तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार पडताळणी अनिवार्य
१ जुलैपासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवर तत्काळ ट्रेन तिकिट बुक करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन आवश्यक असणार आहे.
आधार पडताळणीशिवाय तत्काळ तिकिटे मिळणार नाहीत. त्यामुळे तातडीच्या प्रवासाची योजना आखताना आधार क्रमांक तयार असणे अनिवार्य होणार आहे.
पॅन कार्डसाठी आता ‘आधार’च हवी!
नवीन पॅन कार्डासाठी अर्ज करताना यापुढे इतर कागदपत्र न चालणार. फक्त आधार कार्डच्या आधारेच पॅन कार्ड मिळू शकणार आहे.
आधारशिवाय केलेला अर्ज नामंजूर केला जाणार आहे. यामुळे आता आधार क्रमांकाशिवाय आर्थिक व्यवहार करणे आणखी कठीण होणार आहे.
UPI चार्जबॅक प्रक्रियेत बदल; ग्राहकांना दिलासा
आतापर्यंत बँकांनी चार्जबॅक दावे पुन्हा सुरु करण्यासाठी NPCI अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती.
परंतु आता बँका थेट स्वतःहून चार्जबॅकच्या दावेवर प्रक्रिया करू शकणार आहेत.
२० जूनला नव्या नियमानुसार NPCI ने बँकांना ही मुभा दिली असून, याचा थेट लाभ ग्राहकांना मिळणार आहे.
GST रिटर्न नियम अधिक कठोर, चुका सुधारण्याची संधी बंद GST नेटवर्कने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०२५ पासून GST-3B फॉर्ममध्ये एकदा सबमिट केल्यानंतर कोणतेही संपादन (एडिट) करता येणार नाही.
तसेच तीन वर्षांनंतर मागील तारखांचा रिटर्न भरता येणार नाही.कर चुकवणाऱ्यांसाठी आता दार बंद होणार असून, वेळेत आणि अचूक रिटर्न भरणे गरजेचे ठरणार आहे.
‘नव्या नियमांची’ लवकर तयारी करा!
ही सर्व धोरणे लागू होण्यास केवळ काहीच दिवस बाकी आहेत.
रेल्वे प्रवासी, व्यापारी, करदाता, पॅन कार्ड अर्जदार आणि UPI वापरणारे नागरिक यांनी या बदलांची गंभीर दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.
‘जुलैपासूनचा आर्थिक शिस्तीचा नवा अध्याय’ आता सुरू होणार आहे!