
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा बदल घडणार आहे. चार वेळा आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. पक्षाकडून १ जुलै रोजी अधिकृत घोषणा केली जाणार असून, आज त्यांनी पक्ष मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
युवा मोर्चातून सुरू झालेली चव्हाण यांची भरारी
रवींद्र चव्हाण यांनी राजकारणाची सुरुवात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यापासून केली. पुढे ते डोंबिवलीचे नगरसेवक, सलग चार वेळा आमदार आणि महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सांभाळले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी चव्हाण यांच्या नावावर भरवसा व्यक्त करताना सांगितले, “चव्हाण यांनी प्रत्येक टप्प्यावर पक्षाशी निष्ठा ठेवून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच त्यांना हे महत्त्वाचे पद दिले जात आहे.”
बावनकुळे यांचा कार्यकाळ संपुष्टात
सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्य सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून कार्यरत आहेत. पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्यांच्या कार्यकाळात भाजपने तब्बल १.५ कोटी नवीन सदस्यांची भर घातली. त्यांच्या कार्यशैलीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सलाम करत भाजपच्या बळकटीचा पाया त्यांच्यावर असल्याचे म्हटले.
नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पारंपरिक प्रक्रिया
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्याच उपस्थितीत आज चव्हाण यांनी अर्ज भरला. पक्षाच्या परंपरेनुसार, अर्ज घेण्यात आल्यानंतर निवड प्रक्रियेनंतर नाव निश्चित केले जाते. उद्या संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या समारंभात चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
राजकीय समीकरणात बदलाची चिन्हे
चव्हाण हे मराठा समाजाचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे मराठा समाजात सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अडचणीत सापडली आहे. कोल्हापुरात पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नव्या आव्हानांची मालिका उभी राहिली आहे.
चव्हाण यांच्यापुढे ‘शत-प्रतिशत भाजप’चं आव्हान
मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विजयी वाटचाल आणि २०२९ साठी ‘शत-प्रतिशत भाजप’ हे ध्येय गाठणे – ही चव्हाण यांच्यासमोरील प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत.
त्यांच्या नेतृत्वात भाजपची वाटचाल कशी राहील आणि महाराष्ट्रातील राजकीय समतोलावर याचा काय परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.