
स्वप्नील गाडे|रिपोर्टर
मुंबई | विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अखेर अटक केली आहे. नौशाद इसरार अहमद (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ जुलै २०२२ रोजी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तरप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांत वावरत होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने आपली वेशभूषा बदलली, खोट्या नावाचा वापर केला आणि ६५ पेक्षा अधिक सिमकार्ड आणि मोबाईल बदलले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आरोपीचा माग काढला. अखेर वडोदरा (गुजरात) येथील सेफ एक्सप्रेस कुरीअर गोडाऊनमध्ये ट्रक चालक म्हणून काम करत असताना त्याला अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे व सुरक्षा) सत्य नारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सोनवणे, तांत्रिक विश्लेषक पोलीस हवालदार पवार, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार राजेश पंचरास, रामचंद्र पाटील, खेमु राठोड आणि पोलीस शिपाई गोरख पवार, रामदास निळे, प्रितम मेढे यांनी संयुक्तरित्या केली.