
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वात मोठा बदल होणार असल्याचे संकेत दिल्लीतून मिळाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता नव्या रणनीतीसह नव्या नेतृत्वाची दिशा घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्याभरात नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील पक्षनेतृत्वाने या निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रिजिजू सध्या संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत.
‘एक व्यक्ती, एक पद’ या भाजपच्या मूलभूत धोरणानुसार बावनकुळे यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद आता रिक्त झाले आहे. त्यामुळेच हा नवा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने आता हा पदभार अनुभवी ज्येष्ठ नेत्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावे विशेष चर्चेत आहेत. रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे. यापैकी रवींद्र चव्हाण हे जास्त आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. विशेषतः कोकणातील भाजपच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे. शिवाय, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील आहेत.
जर भाजपने प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजातील नेत्याला देण्याचा निर्णय घेतला, तर रवींद्र चव्हाण यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, पक्षाच्या हालचालींना वेग आला असून जिल्हाध्यक्षांच्या नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांनंतर आता हा निर्णय देखील अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महाराष्ट्र भाजपच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे, हे नक्की!