
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई |वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात बुधवारी रात्री उशिरा एक आश्चर्यजनक आणि थरारक घटना घडली. या व्यस्त आणि गजबजलेल्या भागात एक-दोन नव्हे तर तब्बल दहा अजगर जातीच्या सापांची पिल्ले मुक्तपणे वावरताना आढळून आली. या प्रकारामुळे परिसरात क्षणभर भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सर्पमित्र कौशिक दिलीप केणी आणि सुरज मोरे यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसी कामगिरीमुळे ही सगळी पिल्ले सुखरूपपणे पकडण्यात आली, आणि त्यांच्या जीवाला दिलासा मिळाला.
रात्री सुमारे ११.१५ वाजता, बीकेसी परिसरातून काही नागरिकांनी सापाच्या पिल्लांची हालचाल पाहिल्याची माहिती स्थानिक सर्पमित्रांना दिली. माहिती मिळताच कौशिक केणी आणि सुरज मोरे यांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. अंधार, आणि वाहनांच्या वर्दळीच्या परिस्थितीतही दोघांनी अत्यंत शिताफीने आणि प्रशिक्षित पद्धतीने सर्व दहा अजगर पिल्लांना सुखरूपपणे पकडले.
सर्पमित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व अजगर पिल्ले सध्या सुरक्षित अवस्थेत आहेत. त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या पिल्लांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीकेसीसारख्या नागरीकेंद्रित आणि झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात अशा प्रकारे अजगर पिल्ले सापडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. हे पिल्ले कुठून आली? त्यांच्या आईचा काही मागोवा मिळतोय का? आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक अधिवासाचा र्हास, विकासकामांची झपाट्याची गती आणि जंगलांचा होणारा ऱ्हास यामुळे हे वन्यप्राणी शहरात शिरत आहेत का – हे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कौशिक केणी आणि सुरज मोरे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि परिसरात सर्प वाचवण्याचे कार्य निःस्वार्थपणे करत आहेत. त्यांचे हे धाडसी पाऊल फक्त त्या दहा पिल्लांचेच नव्हे तर परिसरातील नागरिकांचेही रक्षण करणारे ठरले. वन्यजीव संरक्षण, जागरूकता आणि संवेदनशीलता यांचा अनोखा आदर्श त्यांनी पुन्हा एकदा सर्वांसमोर ठेवला आहे.
बीकेसीमधील ही घटना केवळ एक बातमी न राहता, निसर्गाच्या सजीवांबद्दलची जबाबदारी आणि त्यांच्याशी असलेल्या सहजीवनाचे भान ठेवणारा इशारा आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते टिकून राहण्यास मदत होते, हे निश्चित.