
मुंबई प्रतिनिधी
भुलेश्वरमध्ये खुद्द पोलीस असल्याचे भासवून एका व्यक्तीचे अपहरण करून तब्बल ५० लाख रुपयांची बॅग लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई, पुणे, सातारा आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या सहा तासांत पाच आरोपींना अटक केली असून ३९ लाखांची रोख रक्कम, मोटारगाडी आणि सुरा जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदार शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भुलेश्वरमधील पोपळवाडी तिसरी येथे जात असताना चार जणांनी त्याला अडवले. पोलिस असल्याचा बनाव करत आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत अपहरण करून ५० लाख रुपयांची बॅग हिसकावली आणि खारघर, नवी मुंबई येथे रस्त्याच्या कडेला उतरवून धमकी दिली की, “मुंबईत परत आलास, तर चकमकीत ठार करू.”
तांत्रिक तपासाची फळं; गुन्ह्याची उकल
या घटनेची माहिती मिळताच एल.टी. मार्ग पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे दोन आरोपी पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार खेडशिवापूर येथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत उर्वरित आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर सातारा येथून आणखी दोन आरोपी तर ठाण्याच्या शांतीनगरमधून पाचवा आरोपी अटक करण्यात आला.
आरोपींची नावे अशी
अजय बाळकृष्ण लोखंडे (३२), सांगली
रेवणसिद्ध राजाराम जावडे (२७), सांगली
सागर दामोदर जाधव (२९), सांगली
विकास अंकुश देहळे (३८), सांगली
दिलीप काशिनाथ ढेकळे (४३), ठाणे
सर्व आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून ३९ लाखांची रोकड, एक मोटारगाडी व गुन्ह्यात वापरलेला सुरा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींकडे कसून चौकशी सुरू असून, आणखी कोणी यामागे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.