
मुंबई प्रतिनिधी
विलेपार्लेच्या प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संध्या पाठक (वय २१) या तिसऱ्या वर्षाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही आत्महत्या होती की कोणी तिला ढकलले, याचा तपास सध्या विलेपार्ले पोलीस करत आहेत.
संध्या पाठक हिचा मृतदेह आज सकाळी कॉलेजच्या आवारात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कॉलेज प्रशासनाने तातडीने संध्याच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. कॉलेजकडून ती तिसऱ्या मजल्यावरून अपघाताने खाली पडल्याची माहिती देण्यात आली. मात्र, संध्याने आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा महाविद्यालय परिसरात रंगली आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडोरमधून एकटी चालताना दिसत आहे. काही क्षणातच ती मजल्यावरून खाली पडली. तिला तत्काळ बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे समजते.
दरम्यान, संध्याच्या कुटुंबीयांनी मात्र या मृत्यूमागे संशय व्यक्त केला आहे. “संध्याने आत्महत्या करण्यासारखा कोणताही स्वभाव नव्हता. तिच्यावर कोणतं तरी मानसिक दडपण होतं किंवा तिला कोणी ढकललं असावं,” असा आरोप संध्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. सध्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडूनही चौकशी केली जात आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि फॉरेन्सिक रिपोर्टवरून या मृत्यूमागचं खऱ्या कारणावर प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे.
या रहस्यमय मृत्यूमुळे साठ्ये महाविद्यालयात भीतीचं वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.
संध्याच्या मृत्यूचं गूढ उकललं जातं का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.