
मुंबई प्रतिनिधी
मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहणं आता बंद करण्यात आलं असून, अशा प्रकारावर आता थेट कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी भर गर्दीत चालत्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले होते. त्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोकलमार्ग पोलीस आता संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मुख्य स्थानकांवर अधिक कडक नजर ठेवणार आहेत. दरवाजात बॅग घेऊन उभे राहणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार असून प्रवाशांनी नवीन नियमांचं पालन करावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
काय घडलं होतं?
मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सकाळी ९.३० वाजता दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात होत्या. दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या खांद्याला अडकलेल्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या. त्यामुळे धक्का लागून आठ प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर फेकले गेले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सर्व मुंबईकरांना हादरवून टाकणारी ठरली.
मध्य रेल्वेचे तातडीने घेतलेले निर्णय :
1. नवीन लोकल गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर बसवले जाणार.
2. सध्याच्या लोकलमध्येही दरवाजे आपोआप बंद होण्यासाठी यंत्रणा बसवण्याचा विचार.
3. कल्याण- कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन लवकरच कार्यान्वित होणार.
4. ठाणे ते सीएसएमटी सहावी लाईनपर्यंत रेल्वे अपग्रेड करण्याचे नियोजन.
5. सरकारी व खासगी कार्यालयांनी एकाच वेळेस ऑफिस सुरू-समाप्त करू नयेत, वेगळे वेळापत्रक ठेवावे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे भविष्यात अशा दुर्घटना टळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. दरवाजात उभं राहणं ही फक्त सवय नव्हे तर आता मोठं धोका ठरू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आता प्रवाशांच्या सवयी बदलल्या नाहीत तर त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.