
मुंबई प्रतिनिधी
“मराठी माणूस वांद्र्यातच राहिला पाहिजे” या निर्धाराने सुरु झालेला लढा अखेर फळाला आला आहे. वांद्रे पूर्वमधील गौतम नगर येथील पुनर्वसनप्रक्रियेत स्थानिक आमदार अरुण सरदेसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रहिवाशांना वांद्र्यातच नव्या सदनिकांची सोय करण्यात आली आहे.
नवीन उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीसाठी गौतम नगर परिसरातील झोपड्यांवरील हटवण्याच्या नोटिसा प्रशासनाने बजावल्या होत्या. रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी त्यांना थेट मालाडच्या आप्पा पाडा भागात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र या निर्णयाला रहिवाशांचाही विरोध होता. तीव्र विरोध करत सरदेसाई यांनी मंत्र्यांची भेट, विधिमंडळात प्रश्न उपस्थिती केला आणि शासनावर ठोस दबाव या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवला.
सरदेसाई यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर शासनाने प्रकल्पग्रस्तांना वांद्र्यातच नवीन इमारतीत पुनर्वसनाची संधी दिली. त्यानुसार एस आर ए कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सदनिकांच्या चाव्या रहिवाशांना आमदार सरदेसाई यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
“रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी नव्या ऊर्जा देणारे आहेत,” अशी भावना सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
गौतम नगर पुनर्वसन हा केवळ एक विकासप्रकल्प नसून, हा मराठी अस्मितेचा आणि हक्काच्या घराचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.