
पुणे प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्हेगारी विश्वातील एक मोठं प्रकरण उघडकीस आणलं आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गांजाची गुप्त विक्री करणाऱ्या रॅकेटची सूत्रं हलवणारी आणि यापूर्वी पिटा व मोका अंतर्गत गुन्हेगार म्हणून कारावास भोगलेली कल्याणी देशपांडे हिला आंध्रप्रदेशातील इस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून या रॅकेटचा तपास करताना पोलिसांनी बावधन परिसरात छापेमारी करून २० किलो गांजा हस्तगत केला होता. या कारवाईत कल्याणीचा पती आणि जावई अटकेत गेले. मात्र, कल्याणी मात्र यावेळी फरार झाली होती. तिच्या अटकेसाठी विशेष पथक स्थापन करून शोध मोहीम सुरू होती.
आंध्रप्रदेशात साध्या कपड्यांमध्ये लपलेली ‘रॅकेट क्वीन’
गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी पोलिसांच्या जाळ्यातून अखेर सुटत नाही, हे पुन्हा सिद्ध झालं. कल्याणी देशपांडे आंध्रप्रदेशातील राजनगरम येथे एका किरकोळ खोलीत भाड्याने राहत होती. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या चमूने सापळा रचून तिला ताब्यात घेतलं. अटकेच्या वेळी कल्याणीने सामान्य गृहिणीचा वेष घेतला होता, पण पोलिसांच्या सखोल तपासापुढे तिचा मुखवटा टिकला नाही.
पूर्वी वेश्याव्यवसायात, आता गांजाच्या जाळ्यात मास्टरमाइंड
कल्याणी देशपांडे हीच गुन्हेगारी कारकीर्द फार जुनी आहे. काही वर्षांपूर्वी ती वेश्याव्यवसाय चालवत होती. तिच्यावर पिटा अंतर्गत कारवाई झाली होती आणि काही काळ ती तुरुंगातही होती. त्यानंतर मोका गुन्ह्यांतून बाहेर पडल्यानंतर तीने गांजाच्या अवैध व्यापारात पाय रोवले. पती व जावयाच्या मदतीने तिने पुणे, पिंपरी-चिंचवडसह उपनगरांमध्ये मोठं वितरण नेटवर्क तयार केलं होतं.
पोलिसांसमोर नवे धागेदोरे, मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
कल्याणीची अटक ही केवळ सुरुवात आहे, असा विश्वास पोलिसांना वाटतोय. तिच्या अटकेनंतर अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. गांजाचा साठा कुठून आणला जात होता, यामागे कोणत्या पुरवठादारांचे हात होते, कुणाच्या आशीर्वादाने तिचे रॅकेट इतकं विस्तारलं – यावर आता पडदा उघडणार आहे.
‘नारीशक्ती’चा काळा चेहरा – समाजाला कलंक
एकीकडे महिलांचे सामर्थ्य समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेत असताना, कल्याणी देशपांडे सारखी महिला गुन्हेगारीचा अंधार पसरवत आहे, ही खेदजनक बाब आहे. समाजात विष पसरवणाऱ्या अशा टोळ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी नागरिकांमध्ये भावना आहे.
पोलिसांची कारवाई ठरतेय उदाहरण
अंमली पदार्थ विरोधी पथकाने अत्यंत चिकाटीने केलेल्या या कारवाईमुळे आणखी किती गुन्हे उघड होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत असून, आणखी गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी या यशाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.
“गांजाच्या जाळ्यातून तरुणाईचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या टोळ्यांना आम्ही माफ करणार नाही,”
– संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक