
मुंबई प्रतिनिधी
खार पश्चिम येथील एस.व्ही. रोडवर आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या शेजारील बस स्थानकावर अलीकडे गर्दुल्यांचा ताबा वाढला असून, हे बस स्थानक प्रवाशांपेक्षा बेघर व दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी व्यापले आहे. दिवसभर या बाकांवर झोपून राहणाऱ्या व्यक्तींमुळे बसची वाट पाहणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना उभं राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
बेस्ट प्रशासनाने शहरातील अनेक बस स्थानकांचे सौंदर्यीकरण जाहिराती व अन्य योजनांच्या माध्यमातून केलं असलं, तरी खार पश्चिम येथील या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष गेलेले दिसत नाही. प्रवाशांसाठी बसलेल्या बाकड्यांचा गैरवापर होत असून, दारूच्या नशेत असलेल्या लोकांचे बस्तान या ठिकाणी बसल्याने सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः महिलांना या अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. “बस येईपर्यंत उभं राहणं भाग आहे, पण बाजूला झोपलेले, अंगावर नशा असलेले लोक असताना बसची वाट पाहणं धैर्याचं काम वाटतं,” असे एका महिला प्रवाशिनीने सांगितले.
स्थानिक प्रवाशांनी बेस्ट प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हे बस स्थानक प्रवाशांसाठी आहे, गर्दुल्यांचे घर नव्हे. इथे नियमित गस्त आणि स्वच्छता राखणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.