
बीड प्रतिनिधी
टपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला. नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता.
सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी विहिरीत उडी मारून आयु्ष्य संपवलं. या महिलेचा तिच्या सासरच्यांनी घात केला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकानी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं. सासरवास होता तिला. सतत मारहाण केली जात होती. आई-बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा. लग्नाला १० वर्षे झाली होती. ६ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा हिच आमची मागणी आहे असे आई वडिलांनी सांगितले.