सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्याची मान खाली घालवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या साताऱ्यातील दोन तरुणांनी एका २४ वर्षीय जर्मन तरुणीवर बीचवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील दोन तरुण काही दिवसांपूर्वी थायलंडला गेले होते. थायलंडमधील सुरत थानी प्रांतातील कोह फांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर फिरत असताना त्यांना जर्मन तरुणी दिसली. एकटी असल्याचे पाहून या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर पीडित तरुणीने कोह फांगण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सध्या दोन्ही आरोपींना थायलंडमधील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. साताऱ्यातील दोन तरुणांनी परदेशात जाऊन अशा प्रकारे गुन्हा केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास थायलंड पोलीस करत आहेत.


