
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवित व्हिडीओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी आवळल्या आहेत.
यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या २ युवकांना शिरवळ पोलीसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधार सध्या फरार आहे. दरम्यान, शिरवळ पोलीसांच्या पथकाकडून सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नितीन नवनाथ प्रधान (२०),दत्ता आप्पाराव घुगे(२४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक प्रतिष्ठित खासगी डॉक्टर यांचा शिरवळ परिसरातील गावांमध्ये दवाखाना आहे.
दरम्यान, संबंधित खासगी डॉक्टर यांच्याकडे कामाकरिता असलेल्या एका महिलेची नातेवाईक असलेली एक साधारण १९ वर्षीय युवती वैद्यकीय सेवेकरिता असताना अचानकपणे बेपत्ता झाली. याबाबतची बेपत्ता असल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी खासगी डॉक्टर यांच्या मोबाईलवर संबंधित युवतीबरोबरचा एक व्हिडीओ आला आणि डॉक्टरांकडून १ कोटींची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित खासगी डॉक्टरांना हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे निदर्शनास येताच फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्याकडे तक्रार दाखल केली.