
सातारा प्रतिनिधी
मेकॅनिकल इंजिअरिंगमध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प असताना साताऱ्यातील एक तरुणी मागील दोन वर्षांपासून कूपर कंपनीच्या ट्रॅक्टर युनिटमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. ती जिद्दी तरुणी म्हणजे ईशा पाटुकले.
साताऱ्यातील रहिवासी असलेल्या ईशाची कौटुंबिक परिस्थिती तशी बेताची आहे. तिचे वडील महेंद्र पाटुकले यांचा शुक्रवार पेठेमध्ये टेलरिंगचा व्यवसाय आहे. तिची आई जयश्री याही त्यांना हातभार लावत. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. पाटुकले दांपत्याला दोन मुली. त्यापैकी थोरल्या ईशाला लहानपणापासून काही हटके करायचे होते.
म्हणून दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आयटीआयमध्ये मेकॅनिकल ड्राफ्ट्समन या शाखेत प्रवेश घेतला. तिथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पुण्यात फोर्स मोटर्समध्ये इंटरशिप पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा ती साताऱ्यात परतली. केबीपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाला प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षामध्ये तिची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून कपूर कंपनीत निवड झाली.
कूपर कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणून जॉईन झाली. त्याचदरम्यान कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फारुख एन. कूपर यांनी ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा निर्णय घेतला. सातारा एमआयडीसीत त्यांनी ट्रॅक्टर युनिट सुरू केल्याने त्या ठिकाणी ईशाची नेमणूक झाली. सुरुवातीला डिझाईन, मार्केटिंग, सोर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग व प्रॉडक्शन अशा सर्व विभागांत तिने अनुभव घेतला. त्यासाठी तिला प्लांट हेड प्रमोद पोफळे, व्यवस्थापक संजय राठोड यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्यासह इतरांच्या सहकार्याने ती ट्रॅक्टरसारख्या पुरुष प्रधान उत्पादनाच्या क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कूपर कंपनीच्या ट्रॅक्टरचे १ फेब्रुवारी २०२५ मध्ये उद्घाटन झाले. आज या प्लॉटमधून दररोज १०० ट्रॅक्टरच्या उत्पादनाची क्षमता आहे. यामध्ये असेंम्बली आणि पेंट शॉपमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ईशा इंजिनिअरिंग क्षेत्रात करत असलेले काम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महिला अनेकदा स्वतःला कमजोर करतात; परंतु त्यांनी अधिक धाडसी असले पाहिजे. मला आई वडिलांना प्रोत्साहन दिल्यामुळे मी हे काम करू शकले.असे अभिमानाने सांगते इशा पाटुकले…