सातारा प्रतिनिधी
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अलीकडेच मुघल शासक औरंगजेबाबद्दल गौरवोद्द्गार काढले. औरंगजेब हा उत्तम शासक होता, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं विधीमंडळाच्या अधिवेशनातून निलंबन देखील करण्यात आलं आहे.
मात्र अजूनही औरंगजेबाबाबतचा वाद शमायला तयार नाही. अलीकडेच भाजपचे नेते नितेश राणे यांनी अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरी जवळ झोपवायला हवं, असं वक्तव्य केलं. यानंतर राज्यात औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाची कबर ठेवून काय उपयोग आहे. तो देश लुटायला आला होता. तो चोरच होता. त्याचं उदात्तीकरण का करायचं? असा सवाल उदयनराजेंनी विचारला. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनाला जाणाऱ्यांवर देखील निशाणा साधला.
जे लोक औरंगजेबाच्या दर्शनाला जातात. ते का जातात? ते औरंगजेबाचे वंशज आहेत का? औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर त्याला तुमच्या घरी ठेवा. नाहीतर जिथून औरंगजेब आला होता, तिकडे तुम्हीही जावा, देश सोडून जावा, इथं कशाला थांबता, अशा शब्दांत उदयनराजेंनी औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्यांना सुनावलं आहे.
तसेच या प्रकरणात हिंदू-मुस्लीम विषयच नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक होते. मुस्लीमही होते. त्यांचे जवळचे अंगरक्षकही मुस्लीम होते. त्यामुळे औरंगजेबाची कबर ठेवून काही फायदा नाहीये. त्याची कबर जेसीबीने उखडून टाका. जेसीबीचा एक फावडा मारला तरी कबर तुटेल, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.


